तर आपण जातो. आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला, तर त्याच्याजवळ नको का बसायला?' रामाने विचारले.
'अरे, इतका का मी आजारी आहे! तुमचे माझ्यावर प्रेम आहे. मी कितीही जेवलो, तरी पोटभर जेवलो, असे तुम्हास वाटत नाही. मी बरा असलो तरी बरा आहे, असे वाटत नाही. मी आजारी नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल. वेडे आहात, काही वातबीत झाला, तर बसा जवळ. तुम्ही कामाला गेलात, तरच मला बरे वाटेल. गोविंदा, जात तू. राम, तूही पिंजायला जा!' श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे गेले.
सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते. अंथरूणात बसून तो सूत कातीत होता. तोंडाने पुढील गोड श्लोक म्हणत होता.
सुचो रूचो ना तुजवीण काही । जडो सदा जीव तुझ्याच पायी
तुझाच लागो मज एक छंद । मुखात गोविंद हरे मुकुंद ॥
तुझाच लागो मज एक नाद । सरोत सारेच वितंडवाद ।
तुझा असो प्रेमळ एक बंध । मुखात गोविंद हरे मुकुंद ।
'तुझे लुगडे फाटले आहे, त्याला ते झाले असते. तुझ्या भावाने पाठविलेली ओवाळणी-तुझा त्यावर हक्क. ते आम्हांला घ्यावयाचा हक्क नाही.' भाऊ म्हणाले.
'तुम्ही व मी निराळी का आहोत? इतकी वर्षे एके ठिकाणी संसार केला; सुखदु:खे पाहिली, नाना बरेवाईट अनुभव घेतले; अजून का आपण निराळी आहोत? माझे सारे तुमचेच आहे व तुमचे ते माझेच आहे. आहे तरी काय आपणांजवळ? तुम्ही नवीन धोतर नेसलात म्हणजे मीच नवीन लुगडे नेसल्यासारखे आहे. त्यातच माझा आनंद आहे. नेसा, मी त्याला कुंकवाचे बोट लावले आहे.' आई म्हणाली.