रे, जेवण करून येऊ.' एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली.
श्याम या नाना रंगाच्या खडयांकडे पाहत बसला. या लहान खडयांत किती सौंदर्य देवाने ओतले आहे, असा विचार मनात येऊन तो त्या खडयांना हृदयाशी धरीत होता. जणू सौंदर्यसागर परमात्म्याच्याच त्या मूर्ती. भक्ताला जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात, ह्याचा अल्प अनुभव त्याला येत होता. एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती.
गोविंदा, राम, नामदेव सारे त्याच्याजवळ आले.
'श्याम! काय आहे तुझ्या हातांत? फूल का?' रामने विचारले.
'अरे, फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का? मी दूरूनच त्याला हात जोडीत असतो.' श्याम म्हणाला.
'मग काय आहे हातांत?' नामदेवाने विचारले.
'देवाच्या मूर्ती.' श्याम म्हणाला.
'तुमची गणपतीची मूर्ती तर तुम्ही देऊन टाकली ना बाबूला?' भिकाने विचारले.
'हो, पण माझ्याजवळ किती तरी मूर्ती आहेत.' श्याम म्हणाला.
'तुझ्यासारखी जन्माची सोबतीण व अशी गोड व गुणी मुले असल्यावर मी का आनंदी होणार नाही? मी दरिद्री नसून श्रीमंतांहून श्रीमंत आहे. मग मी का हसणार नाही, का सुखी होणार नाही? आण ते धोतर.' असे म्हणून आईच्या हातातून ते धोतर त्यांनी घेतले. ते ते नेसले व देवांना त्यांनी नमस्कार केला.
वडिलांचे नेसूचे धोतर पाहून आम्हांलाही आनंद झाला; परंतु खरा आनंद जर कोणाला झाला असेल, तर तो माझ्या आईला. तो अनुभव स्वत:च अनुभवून पाहावा लागतो. प्रेमपूर्वक त्यागातील आनंद त्याची चव तसे करीत गेल्यानेच समजू लागते. एकदा चटक मात्र लागली पाहिजे.