मी सांगायला नको. तू तरी का श्रीमंत आहेस? गरीबच तू, परंतु परकी नाहीस तू मला, म्हणून सांगितले.' आई म्हणाली.
'बरे, हो, त्यात काय झाले? इतके मनाला लावून घेऊ नकोस. सारे मनाला लावून घेतेस. तुझे खरे दुखणे हेच आहे. मुलांना हवीस हो तू. धीर धर.' नमू म्हणाली.
'आता जगण्याची अगदी इच्छा नाही. झाले सोहाळे तेवढे पुरेत.' आई म्हणाली.
'तिन्हीसांजचे असे नको ग बोलू. उद्या की नाही, तुला गुरगुल्या भात टोपात करून आणीन. खाशील ना?' नमूमावशीने विचारले.
'नमू! डोळे मिटावे हो आता. किती ग ओशाळवाणे, लाजिरवाणे हे जिणे?' आई डोळयांत पाणी आणून म्हणाली.
'हे काय असे? बरे होशील हो तू व चांगले दिवस येतील. तुझे श्याम, गजानन मोठे होतील. गजाननला नोकरी लागली का?' नमूने विचारले.
'महिन्यापूर्वी लागली. परंतु अवघा एकोणीस रूपये पगार. मुंबईत राहणं, तो खाणार काय, पाठविणार
करतात, त्यांना देव मदत करतो. तू मला मदत करीत आहेस, ती देवानेच पाठविली. मे महिना आला, की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू येतो. अनेकांच्या रूपाने मदत करावयास देव उभा राहतो. कधी श्यामच्या रूपाने, कधी जानकीबाईच्या रूपाने.'
'आई, मला भेटेल का, गं, देव?' मी एकदम विचारले.
'पुण्यवंताला भेटतो. पुष्कळ पुण्य करावे. सर्वांच्या उपयोगी पडावे. म्हणजे देव भेटतो.' आई म्हणाली.
जानकीवयनी मला म्हणाल्या, 'श्याम, का बोवा वगैरे व्हायचे आहे की काय; मग शिकतो आहेस कशासाठी? इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर. आईला नोकरीवर ने.'