नका. तुमच्या जिवावर मी पूर्वी उडया मारल्या. सारी सुखे भोगली. वैभवात लोळले. मला काही कमी नव्हते हो. आले आहेत चार कठीण दिवस, जातील. मी पाहिले नाही, तरी मुलांचे वैभव तुम्ही पाहा. तुमच्या डोळयांत मी येऊन बसेन हो.' असे आई बोलत होती.
'तू सुध्दा बरी होशील. सखू येत आहे, ती तुला बरी करील.' वडील म्हणाले.
'कशाला खोटी आशा आता! आतून झाड पोखरले आहे सारे, ते पडणारच हो. माझे सोने होईल. भरल्या हातांनी मी जाईन. सुवासिनी मी जाईन. तुम्हांस कोण? म्हणून फक्त वाईट वाटते; नाहीतर काय कमी आहे? तुमच्या मांडीवर तुमच्याजवळ मरण यावे, याहून भाग्य कोणते? या भाग्यापुढे सारी सुखे तुच्छ आहेत. या भाग्याच्या आनंदामुळे सारी दु:खेही मला आनंददायकच वाटतात.' असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला कढत हात ठेवला. बोलण्याने आईला थकवा आला होता.
'पाणी, थोडे पाणी द्याना तुमच्या हाताने.' आईने प्रेमाने सांगितले. वडिलांनी झारीने थोडे पाणी तोंडात घातले.
मदत करावयास? अजून सून थोडीच आली आहे घरात? श्याम नाही मदत करणार, तर मग कोण करील? जानकीबाई! बायकांना कधी कधी पुरूषांची कामे करावी लागतात. त्यांना कमीपणा थोडाच आहे? श्याम मला डाळ-तांदूळ निवडावयाला लागतो, धुणी धुवायला लागतो, भांडी विसळायला- सर्व कामांत मदत करतो. त्या दिवशी माझे लुगडे धुतलेन् हो. मी म्हटले, 'श्याम, लोक तुला हसतील.' तर म्हणे कसा, 'आई! तुझे लुगडे धुण्यात माझा खरा आनंद आहे. तुझी चौघडी मी पांघरतो. मग धुवावयाला का लाज वाटेल?'