ते गाळून घेई; नाहीतर त्यात लोणी यावयाचे. असे ते अदमुरे ताक मावशी आईला द्यावयाची. येताना तिने मोसंबी आणली होती. पुरवून पूरवून त्यांचा रसही ती देत असे. सार्या जन्मात आईची कधी व्यवस्था नव्हती, अशी मावशीने ठेवली होती. सार्याअ जन्मात हाल झाले; परंतु मरताना मावशीने हाल होऊ दिले नाहीत. मावशी म्हणजे मूर्तिमंत कळकळ व सेवा! अत्यंत निरलस व व्यवस्थित.
"ती मथी सारखी म्यांव म्यांव करते आहे. तिला आज भात नाही का रे घातलास?' आईने विचारले. आईच्या आवडत्या मांजरीचे नाव मथी होते. मथी दुधाणीला कधी तोंड लावीत नसे. तिला थेंबभर दूध घातले, म्हणजे पुरत असे. मोठी गुणी मांजर. आई आजारीपणात त्या मांजरीचीही चौकशी करीत असे.
"अक्का, तिला भात घातला; परंतु ती नुसते तोंड लावी. दुधा-तुपाचा भात; परंतु तिने खाल्ला नाही. खाल्ला असेल उंदीरबिंदीर.' मावशी म्हणाली.
'नाहीतर पोटबीट दुखत असेल तिचे. मुकी बिचारी! बोलता येत नाही; सांगता येत नाही.' आई म्हणाली.
'बाळ, १०८ पोफळी माझी घालून झाली आहेत. मागे सीताआत्याने पाठविली होती.'
'मग तू काय घालणार आहेस? दोन दिवस तर राहिले सोमवतीला. काही ठरवावयास हवे ना! आई! १०८ गूळ म्हणजे का १०८ गुळाच्या ढेपा वाहावयाच्या! १०८ तेल म्हणजे का १०८ तेलाचे डबे द्यावयाचे!'
आई म्हणाली, 'कोणी १०८ डबे दिले, तरी हरकत नाही. परंतु गरीब असला, तर तो ठरवितो, की १०८ अदपाव देईन; १०८ पावशेर देईन किंवा एकदम १। मण गूळ, १। मण तेल असेही देतात. त्यात वाटेल तसे १०८ भाग बसवावे.'