आईचे दुखणे वाढतच होते. दुखण्याचा पाय मागे नव्हता, पुढेच होता. मुंबईहून मोठा भाऊ चार दिवसाची रजा घेऊन घरी आईला भेटावयास आला होता. नुकतीच त्याला नोकरी लागली होती. रजा मिळत नव्हती. मोठया मिनतवारीने चार दिवसांची रजा मिळाली.
आईला पाहून त्याला भडभडून आले. 'आई! काय, ग, तुझी दशा! तू इकडे होतीस, काम करीत होतीस. आई! आम्ही तिकडे खुशाल खात होतो; परंतु तुला घास मिळत नव्हता!' असे म्हणून तो रडू लागला. धाकटया पुरूषोत्तमाने सारी हकीकत त्याला सांगितली होती. आईने कसे हाल काढले, दवंडी कशी पिटली, ते सारे त्याने सांगितले. दादाचे हृदय दुभंग झाले.
आई म्हणाली, 'चाललेच आहे. बाळांनो, या देहाला चांगले दिले काय, वाईट दिले काय, जोपर्यंत देवाला यंत्र चालवावयाचे आहे, तोपर्यंत ते चालणार. तू वाईट वाटून घेऊ नकोस. तुम्ही का तिकडे चैन करता? तूही दिवसभर काम करतोस.
मी विचारले, 'आई ! तू १०८ अदपाव गूळ घातलेस तर?'
आई म्हणाली, 'श्याम! घरात विष खावयास दिडकी नाही, गळफास लावायला सुतळीचा तोडा नाही. कोठून आणावयाचे पैसे? झाड का आहे आपल्या अंगणात? हलविले की पडले पैसे! आपण गरीब आहोत, श्याम!'
मी म्हटले, '१०८ आवळे घातलेस, तर?'
'बाळ! १०८ आवळे एकदा मी घातले होते, सोवलीहून त्यांनी आणले होते. आपला सोवलीचा तुकाराम नव्हता का, त्याने दिले होते.' आई म्हणाली.
आई! १०८ चिंचोके घातले, तर नाही का चालणार?' मी हसत हसत विचारले.