तू पाच रुपये पाठविलेस, मला धन्य वाटले. तू एकोणीस रूपयांतून त्यांना पाच रूपये पाठविलेस- खरेच मुठभर मांस मला चढले. मुलाकडून आलेली पहिली मनीऑर्डर म्हणून त्यांना आनंद झाला. आता मला चिंता नाही. तुम्हांला तयार करणे एवढेच माझे काम! तुम्ही गुणी निघालात- चांगले झाले. तुम्हांला पैसे मिळोत वा न मिळोत; तुमच्याजवळ गुणांची संपत्ती आहे- आता मला काळजी नाही. श्याम तिकडे आहे; ह्या पुरूषोत्तमाला मावशी तयार करील. एकमेकांना प्रेम द्या. परस्परांस विसरू नका.' आई जणू निरवानिरव करीत होती.
'आई! मी येथेच राहू तुझ्याजवळ? राहू का? काय करायची नोकरी? आईची सेवा हातून होत नसेल, तर नोकरी कशाला? आई ! मला नोकरीची हाव नाही, खरोखरच नाही. तुझ्या पायांच्या सेवेपेक्षा वरिष्ठांचे बूट मला पूज्य नाहीत. आई! तुझे पाय, तुझी सेवा यांतच माझे कल्याण, माझे भाग्य माझा मोक्ष, माझे सारे काही आहे. आई! तू सांगशील,
आई म्हणाली, 'हो, चालतील तर काय झालं! पण...'
'पण काय लोक हसतील, होय ना? हसतील त्यांचे दात दिसतील! त्यांचे हसायला काय जाते? द्यायला थोडेच कोणी येते आहे? हसायला सारे, मदत करायला कोणी नाही, देव तर हसणार नाही ना? देव रागावणार नाही ना?' मी विचारले.
आई म्हणाली, 'श्याम! देव नाही रागावणार. अरे, देवाला विदुराघरच्या कण्यासुध्दा आवडल्या; मिटक्या मारमारून त्याने खाल्ल्या. सारखे ताट चाटीत होता, तरी त्याची तृप्ती होईना. देवाने सुदाम्याचे पोहे कसे खाल्ले, जसा अधाशी व