तसे मी करीन. राजीनामा. मी लिहून आणला आहे. देऊ का पाठवून?' दादा गहिवरून बोलत होता.
आई विचार करून हळूच म्हणाली, 'गजू! सध्या सखूमावशी येथे आहे. नोकरी आधीच मिळत नाही. मिळाली आहे मुश्किलीने ती ठेव. त्यांना पाच रूपये पाठवत जा. दोन पाठविलेस, तरी चालतील. परंतु दर महिन्याला आठवण ठेवून पाठव. त्यांच्या सेवेत माझी सेवा आहे. मी इतक्यात मरत नाही. तितके माझे भाग्य नाही. झिजत झिजत मी मरणार. फारच अधिक वाटले, तर पुन्हा तुला बोलावून घेईन हो बाळ.'
दादा परत मुंबई जावयास निघाला. अभागी श्यामप्रमाणे अभागी गजानन निघाला. आईचे हे शेवटचे दर्शन, अशी त्याला कल्पना नव्हती. आईच्या पायांवर त्याने डोके ठेवले. आईच्या तोंडाजवळ त्याने आपले तोंड नेले. आईने त्याच्या तोंडावरून, डोक्यावरून आपला कृश हात, प्रेमाने थबथबलेला हात फिरवला, तो मंगल हात फिरवला. 'जा, बाळ; काळजी नको
उपाशी! रूक्मिणीला एक मूठ देण्यास तयार होईना. देव उपाशीच असतो. प्रेमाने त्याला कोण देतो? लाखांत एखादा! प्रेमाने दिलेलेच त्याच्या पोटात जावयाचे. भुकेल्या देवाला द्रौपदीचे पान खाऊन ढेकर आली. देवाला प्रेमाने द्या. ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे. शबरीची उष्टी बोरे. ती कशी खाल्ली रामाने? तू वाचले आहेस ना? देवाला सारे चालते, त्यात भावभक्तीचे तूप ओतलेले असले म्हणजे झाले. त्यात हृदयाचा ओलावा असला, म्हणजे झाले. मग चिंचोकेच काय, पण १०८ दगड जरी देवाला दिलेत, तरी त्याला खडीसाखरेप्रमाणे