थोडेसे सामान घेऊन मी निघालो, स्टेशनवर नामदेव पोचवावयास आला होता. मी गाडीत बसलो. दोघांचे डोळे भरून आले होते.

'पत्र लगेच पाठव बरे, श्याम.' नामदेव म्हणाला.

'होय.' मी म्हटले.

'तुझ्याबरोबर मी आलो असतो. पण पैसे नाहीत.' तो म्हणाला.

'तू माझ्याबरोबर आहेसच.' मी म्हटले.


गाडी सुटली. प्रेमळ नामदेव डोळयाआड झाला. गाडी सुटली व डोळयांतून पाझर सुटले- शतपाझर सुटले. राहून राहून हृदय उचंबळून येत होते. गाडीच्या खिडकीच्या बाहेर माझे तोंड होते. अश्रुसिंचन करीत मी जात होतो.


बोरीबंदरवर उतरून तसाच परभारे मी बोटीवर गेलो. कारण गिरगावात भावाला भेटायला गेलो असतो, तर आगबोट चुकली असती. मी आगबोटीत बसलो. लाटांवर बोट नाचत होती. माझे हृदयही शतभावनांनी नाचत होते. रवीन्द्रनाथांची गीतांजली माझ्या हातांत होती.


'आई! माझ्या अश्रूंचा हार तुझ्या वक्षस्थळावर रुळेल.'


452 of 468



'नको रे दादा, तुम्ही बामण. कोणी पाह्यलं, तर मारतील मला! नको रे दादा. जा, बाबा. कोणी येईल महारवाडयातून वरंड वगैरे घेऊन, तो देईल डोईवर.' असे ती गयावया करून विनवू लागली.

'अग, मी घरी गेल्यावर आंघोळ करीन हो, घे' असे म्हणून शेवटी तिच्या डोक्यावर मी मोळी चढविली.

'अरे श्याम! ती महारीण ना? अरे, तिला शिवलास काय? एवढयात इंग्रजी शिकून साहेब झालास वाटतं? भाऊरावांना सांगितलेच पाहिजे.' श्रीधरभट कोठूनसे अकस्मात उगवले व मला बोलू लागले. इतक्यात त्यांचा


452 of 773