हे मी वाचीत होतो. खरेच माझ्या गरीब आईला मी दुसरे काय देणार? माझ्याजवळही अश्रूंशिवाय द्यावयास दुसरे काही नव्हते. मध्येच मी गीतांजली मिटीत असे व समोरच्या उचंबळणार्यां सागराकडे बघे. या सागरावर शततरंग उसळत होते. एक लाट दुसर्या लाटेला जन्म देत होती. माझ्या हृदयसागरावर शतस्मृती उसळत होत्या. एक स्मृती दुसर्या स्मृतीस जन्म देई. आईच्या शेकडो आठवणी, शेकडो भावनामय प्रसंग- दृष्टीसमोर सारे येत होते. स्वप्नसृष्टीत, स्मृतिसृष्टीत मी ध्यानमग्न ऋषीप्रमाणे रमून गेलो. रंगून गेलो. आईच्या स्मृतिसागरात हा श्याममत्स्य डुंबत होता, पोहत होता, नाचत होता.
हर्णे बंदरावर दीपस्तंभ दिसू लागला. हर्णे हर्णे खलाशी ओरडू लागले. उतरणारे उतारू वळकटया बांधू लागले. मी आपले लहानसे गाठोडे बांधले. आणखी सातआठ तासांनी आईचे पाय पाहीन, प्रेमाने भरलेले डोहच असे तिचे डोळे पाहीन, असे मनात मी म्हणत होतो.
हर्णे बंदर आले. पडाव बोटीजवळ आले. त्यांत माणसे उतरली.
शब्द ऐकून शेजारच्या घरात ओसरीवर बसलेले दुसरे गृहस्थही बाहेर आले आणि 'श्याम! अगदीच च्येवलास तू. अरे, काही ताळतंत्र तरी!' असे ते बोलू लागले.
मी त्यांना म्हटले, 'मी घरी जाऊन आंघोळ करणार आहे. तसाच घरात शिरून काही घर बाटविणार नाही. ही म्हातारी किती वेळ थांबेल? काळोख होईल तिला जावयाला. नदीतून जावयाचे आहे तिला. मी स्नान करणार आहे. 'स्नानात् शुध्दी:' हे मला माहीत आहे.' असे म्हणून मी तेथून गेलो.
मी घरी आलो. आई म्हणाली, 'त्या म्हातारीला आपल्याकडेच हाक मार.