कायमची अंतरली आई! असे म्हणून मी रडू लागलो.
'श्याम! त्या दिवशी तुझीच सारखी आठवण काढीत होती. तूच तिला सारखा दिसत होतास. म्हणे, अजून हट्टीच आहे.
श्याम! दोन दिवसात अक्का जाईल, असे वाटले नव्हते. मी तुला बोलवावयाचे ठरविले; परंतु त्याच दिवशी अक्का गेली! सारे प्रयत्न केले. तिचे हाल होऊ दिले नाहीत. मी आहे हो तुम्हांला. अक्काने तुम्हांला माझ्या पदरात घातले आहे. मी तुम्हांला आईची आठवण होऊ देणार, नाही उगी, किती रडशील!' मावशी मला समजावीत होती.
'मावशी! माझे केवढाले मनोरथ! माझ्या आईला सुख देईन. तिला फुलासारखी ठेवीन, असे मी मनात म्हणे परंतु आता कशाला शिकू? शिकून आईची सेवा जर करता येत नसेल, आईच्या उपयोगी पडता येत नसेल, तर कशाला शिकू?' मी म्हणालो.
'तुझ्या भावांसाठी, वडिलांसाठी शीक; आमच्यासाठी शीक. जगासाठी शीक. आईला प्रेम देणार होतास, ते जगाला दे. जगातील दु:खी मातांना दे.' मावशी नवीन दृष्टी देत म्हणाली.
'द्या, आई, देव तुमचे भले करो. गरिबाचे दुनियेत कुणी नाही, बघा!' दीनवाणी म्हातारी बोलली.
आईने भात पत्रावळीवर आणला. मी तो तिला दिला. अंगणाच्या कडेला बसून तिने खाल्ला.
'वायच पाणी घालताव, दादा?' ती मला म्हणाली.
पाणी आणून मी दुरून तिच्या ओंजळीवर घातले. पाणी पिऊन दुवा देत ती निघून गेली.
'चल, श्याम, तू आंघोळ कर.' आईने सांगितले. आईने केळीजवळ दुरून माझ्या अंगावर पाणी घातले व सारे अंग भिजल्यावर मी दुसर्याव दगडावर बसलो. मग स्वत:च्या हाताने पाणी घेऊन