असे म्हणतात. आम्ही नदीवर गेलो. पिंड तयार केले. सर्व विधी झाले. ते पिंड दर्भावर ठेवले. नदीवर कावळा दिसेना. भटजींनी काव काव करून कावळयांना आमंत्रण दिले. 'आला, एक कावळा आला, तो दुसराही आला,' चुलते म्हणाले. आम्हांला बरे वाटले. पिंड ठेवून आम्ही बाजूला झालो. कावळे पिंडावर बसत, शिवत ना. काय करावे? पिंडाभोवती घिरटया घालीन; परंतु स्पर्श करती ना. मला वाईट वाटू लागले, मी म्हटले, 'आई! तुझी इच्छा असेल तर मी लग्न करीन. मी बैरागी होणार नाही.' तरी कावळा शिवेना. चुलते म्हणाले, 'आम्ही भाऊंना अंतर देणार नाही. त्यांच्यावर, वयनी, प्रेम करू.' तरी कावळा शिवेना. पिंड घेऊन ठिकठिकाणी मी नाचलो. माझा जीव रडकुंडीस आला. कावळा जर शिवला नाही तर दर्भाचा कावळा करून शिववितात; परंतु या गावात या गोष्टीची चर्चा होते. मला वाईट वाटले. मी म्हणालो, 'पिंड घेऊन घरी जाऊ. तेथे कदाचित शिवेल. एवढयात दर्भाचा नका करू.'
मान देतात हो. त्या पंढरीनाथांची गोष्ट सांगतात ना. ते गरीब होते. तेव्हा त्यांना सारे पंडया पंडया म्हणून हाका मारीत; परंतु पुढे ते देशावर गेले, शिकले, वकील झाले. त्यांनी वर्हा ड-खानदेशात फावडयांवारी पैसा मिळविला. मग ते आपल्या गावात एकदा आले होते. आपल्या सोमेश्वराचा त्यांनी मोठा उत्सव केला. लोक त्यांना 'पंढरीनाथ बाबा' म्हणू लागले. कुणाच्याही घरी ते गेले होते. तेथे त्यांना बसावयास पाट देण्यात आला. तो पाट त्यांनी दूर केला व म्हणाले, 'तात्या, हा पाट मला नाही तुम्ही दिलात, माझ्या पैशाला दिलात.