नदीवरुन जड अंत:करणाने पिंड घेऊन आम्ही घरी आलो. अंगणाच्या कडेला केळीशेजारी पिंड ठेविले. भोवती कावळे जमले; परंतु एकही शिवेना!
शेवटी माझी दूर्वांची आजी घरातून बाहेर आली. ती म्हणाली, 'यशोदे, काही काळजी नको करु. पुरूषोत्तमला मी आहे. त्याचे सारे मी करीन.' काय चमत्कार ! आजीचे ते आश्वासनपर शब्द ऐकताच झटकन् कावळा शिवला.
माझ्या डोळयात पाणी आले. मावशी पुढे एकटी निघून गेली होती. लहान पुरूषोत्तम घरी आजीजवळ आता राहणार. तो जरा खोडयाळ होता. त्याची आबाळ होईल, त्याला मारतील, रागावतील, हीच आईला काळजी होती. आईला हीच एक चिंता होती. आई! केवढे तुझे प्रेम! तुझ्या प्रेमाला मोजमाप नाही. ते आकाशाहून मोठे व समुद्राहून खोल आहे. ईश्वर किती प्रेममय असेल ह्याची कल्पना ह्या संसारातील आईवरून येईल. स्वत:च्या प्रेमाची जगाला कल्पना देण्यासाठीच ह्या छोटया आईला ती जगन्माऊली पाठवीत असते.
माझ्या हातातली ही सोन्याची सलकडी या पाटावर ठेवतो व मी खालीच बसतो. तुम्ही पैशाला मान देता; मनुष्याला मान देत नाही. मनुष्याच्या हृदयातील देवाला मान देत नाही.
हृदयातील श्रीमंतीस मान देत नाही. तुम्हांला हे पिवळे पांढरे दगड आणि त्या कागदी नोटा ह्याच पूज्य आहेत.' श्याम, असे ते म्हणावयाचे. महारामांगाजवळ पैसे नाहीत, म्हणून त्यांना आपण दूर ठेवतो. हेच उद्या जर श्रीमंत झाले. तर आपण महारमांग ठरू. श्याम! महार असो वा मांग असो, सर्वांना मदत करावी. घरी येऊन आंघोळ करावी. कारण