माझे तुझ्यावर प्रेम आहे असे मी कोणत्या तोंडाने म्हणू? या मांजरीच्या प्रेमाच्या पासंगासही माझे प्रेम पुरणार नाही!'
'मित्रांनो! अशी माझी आई होती. जगाच्या बाजारात अशी आई मोठया भाग्याने मिळते. माझ्या आईनेच मला सारे दिले. माझ्यात जे चांगले आहे, जे पवित्र आहे, ते सारे तिचे आहे. माझी आई गेली; परंतु भारतमातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. एका जपानी मातेने स्वत:च्या हृदयात खंजीर भोसकून घेतला व मुलाला एक चिठ्ठी लिहून ठेवली, 'माझ्यामुळे तू लढाईला जात नाहीस. माझ्या मोहात तू सापडला आहेस. तुझ्या मार्गातील मोह मी दूर करते.' माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला असेच दिसले असेल! हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल. फक्त माझीच, या साडेतीन हात देहाचीच पूजा करीत बसेल, असे तिला वाटले असेल. इतर बंधुभगिनींची सेवा करावयास तो जाणार नाही. स्वातंत्र्ययुध्दात तो मातृमोहाने पडणार नाही, म्हणून आईने स्वत:ला दूर केले असेल. सर्व
! ज्याचे आपल्या आईबापांवर, बहिणभावावर प्रेम नाही, तो महारावर, मांगावर करील का? आधी घरातील सार्यांयवर प्रेम करा. मग एकनाथाप्रमाणे महाराच्या मुलीसही पोटाशी धरण्याचे सामर्थ्य येईल. प्रेम हृदयात मावत नाहीसे झाले, म्हणजे ते सर्वांकडे धावते. श्याम, मी काय तुला सांगणार? देव सर्वत्र आहे म्हणून पुराणात सांगतात. मला तरी वेडीला काय कळते? तू मोठा झालास, म्हणजे तुला कळेल.'
आई मजजवळ बोलता बोलता दिवे लागावयाची वेळ झाली. मला कोणी तरी 'श्याम श्याम' म्हणून बाहेरून हाक मारली, म्हणून मी निघून गेलो.