मुलाने विचारले.
'हो समुद्रमंथनाच्या वेळेस तो चौदा रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे.' परभारे नामदेवनेच उत्तर दिले.
श्याम वर्णनाच्या भरात होता. 'आपल्या मुलाच्या अंगाखांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते. किंवा चंद्रच शेकडो रूपे घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे, असे वाटते. सारी मौज असते. वारे वहात असतात. नारळी डोलत असतात, लाटा उसळत असतात, दीप चमकत असतो, चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो. तांडेल व खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते. कोणाचे सामान राहून जाते, कोणाचे बदलते, कोणाचे हरवते! कोणाला पडाव लागतो, कोणाला उलटी येते, ती एखाद्याच्या अंगावर होते व मग तो उसळतो. हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था, सारा गोंधळ, सारा उदासीनपणा, सारी सहानुभूतिशून्यता तेथे दिसून येते.
आम्ही पडावात बसलो; पडाव चालू झाले. वल्हवणारे
दिवस पवित्रच आहे. प्रत्येक दिवस देवाच्या घरूनच येतो.' ते वडवलीस गेले. दिवसभर राहिले. तिन्हीसांजा झाल्या व ते घरी परत जाण्यास निघाले.
घरोब्याच्या एका म्हातारबाईने सांगितले, 'भाऊदा! तिन्हीसांजा म्हणजे दैत्याची वेळ. या वेळेस जाऊ नका. त्यातून अवसेची काळरात. बाहेर अंधार पडेल. तुम्ही नाल्याजवळ जाल तोच अंधार होईल. येथेच वस्तीला रहा. कोंबडयाला उठून थंड वेळेस जा.' भाऊंनी ते ऐकले नाही. ते म्हणाले, 'म्हाता-ये ! अग, पायाखालची वाट, झाली रात्र म्हणून काय झाले? मी झपाझप जाईन.