साने गुरुजी लिखित “श्यामची आई” हे प्रताधिकार मुक्त आहे. हे पुस्तक विनामूल्य वाचनासाठी आहे. त्यावर सर्वांचा कायदेशीर अधिकार आहे. हे पुस्तक जास्तीतजास्त लोकांना वाटण्याचे अधिकार व जबाबदारी आम्ही आपल्याकडे देत आहोत.
श्यामचीआई (Shyamachi Aai)
लेखक : सानेगुरूजी
साने गुरूजी असे होते.. (पु.लं. च्या शब्दात)
"ह्या जगामध्ये असुरांच्या सृष्टीत सुरांचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून ज्यांनी प्रयत्न केले त्यांत गुरुजींचे स्थान आधुनिक काळात तरी अनन्यसाधारण आहे. अजोड आहे.
`ब्राह्मणही नाही, हिंदुही नाही, न मी एक पंथाचा!
तेच पतित की, आखडिती जे प्रदेश साकल्याचा!'
केशवसुतांचा `नवा शिपाई' मला साने गुरूजींमध्ये दिसला. साकल्याच्या प्रदेशातला हा फार थोर प्रवासी. जीवनाच्या किती निरनिराळ्या अंगांत ते रमले होते. साने गुरुजींच्या डोळ्यांत अश्रू येत असत. हो येत असत. मी तर म्हणतो की तसले अश्रू येण्याचे भाग्य एकदा जरी तुमच्या
जाण्यास शिक्षणाने तयार होण्याऐवजी वस्तूच्या बाह्य रूपरंगावरच भुलू लागलो होतो. जे शिक्षण मनुष्याला इतरांच्या हृदयात नेत नाही, इतरांच्या हृदयमंदिरातील सत्यदृष्टी दाखवीत नाही, ते शिक्षण नव्हे. शिक्षणाने मला प्रत्येक वस्तू, प्रत्येक व्यक्ती म्हणजे ज्ञानमंदिर वाटले पाहिजे. ह्या सर्व बाह्य आकाराच्या आत जी दिव्य व भव्य सृष्टी असते, तिचे दर्शन मला झाले पाहिजे. ते जोपर्यंत होत नाही, अंधुकही होत नाही, तोपर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ समजावे. हृदयाचा विकास ही एक अतिमहत्त्वाची, जीवनात सुंदरता व कोमलता आणणारी वस्तू आहे.