आम्हांस सोडून गेला!
आई नेहमी म्हणायची, 'यशवंत पुण्यात्मा होता, म्हणून तो एकादशीच्या दिवशी देवाकडे गेला,' लहानपणी आम्ही आकाशाकडे पहात असू व तो तारा यशवंताचा असेल, असे एकमेकास दाखवून म्हणत असू. पुण्यात्म्यांचे आकाशात तारे होतात, असे वडील आम्हास सांगत. आम्हालाही ते खरे वाटे.
आज यशवंत नाही व आईही नाही; परंतु त्या मरण-प्रसंगीचे खरे उभयतांचे प्रेम, ते अमर आहे. असा थोर भाऊ व अशी थोर माता मला मिळाली होती. या विचाराने मला धन्यता वाटते. त्यांच्या नखांची सर मला नाही; मी पामर किडा; परंतु माझ्यातही काही चांगुलपणा, काही प्रेम असले तर त्याचे श्रेय त्या मातृनिष्ठ भावास व मुलांच्या शीलांस जपणार्या त्या थोर मातेस आहे. अशी आई व असे भाऊ लाभावयाला पूर्वसुकृतच लागते. 'बहुता सुकृतांची जोडी' पदरी असावयास हवी. सत्संगती लाभावयास जशी पुण्याई लागते, त्याप्रमाणे थोर मातापितरे, थोर भावंडे मिळावयासही
लग्न
आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळा! नदीतीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते. देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते. त्याला पार बांधलेला होता. त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधी कधी येऊन बसत असत.
गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले होते. ते टेकडीवर जाऊन बसले होते. लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे. त्याने आपली बांबूची बासरी बरोबर