श्लोक ते शिकवायचे. वडील नुसते तोंडपाठ नसत घेत करून, तर अर्थही सांगावयाचे. 'सौमित्र म्हणजे कोण?' असे ते विचारीत. आम्हाला सांगता आले नाही तर पुन्हा प्रश्न विचारीत. 'लक्ष्मणाची आई कोण?' आम्ही सांगावे 'सौमित्रा'. मग सौमित्र म्हणजे कोण?' आम्ही सांगावे अंदाजाने 'लक्ष्मण' भले शाबास! अशी मग ते शाबासकी देत. सौमित्र याचा अर्थ सांगितल्यावर मग राधेय म्हणजे कोण, सौभद्र म्हणजे कोण वगैरे विचारीत. जणू शिक्षणशास्त्राप्रमाणे ते शिकवीत. वडिलांच्या या पध्दतीमुळे शेकडो संस्कृत शब्दांचा अर्थ आम्हाला समजू लागला होता.
वडिल पहाटे शिकवीत तर सायंकाळी आई शिकवी. 'दिव्या दिव्या दीपोत्कार। कानी कुंडल मोतीहार। दिवा देखून नमस्कार।' किंवा 'तिळाचे तेल कापसाची वात। दिवा तेवे मध्यानरात। दिवा तेवे देवापाशी । माझा नमस्कार सर्व देवांच्या पायापाशी ॥' वगैरे आई शिकवीत असे. आम्हालाही त्यामुळे पाठ करण्याचा नाद लागे. दुपारी जेवणाचे वेळी
आल्यावर त्यांचे हार करावयाचे. वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत. सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवावयाची व सायंकाळी गुलबाक्षीची फुले गोळा करावयाची. सायंकाळी गुलबाक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे. दुसर्याऊच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबाक्षीवरचीही फुले मी आणीत असे. कारण त्यांना ती थोडीच हवी असत? फुलांची आवड आहे कोणाला? देवपूजा कोणाला हवी आहे? देहपूजा करणारे सारे होत आहेत. फूल तोडून कोणी शेंबडया नाकात कोंबतील, नाहीतर घामट केसात खोवतील! फुले देवाच्या पूजेसाठी