जर वडिलांनी न शिकविलेला परंतु आम्हीच पाठ केलेला श्लोक आम्ही म्हटला तर वडील शाबासकी देत. त्यामुळे आम्हास उत्तेजन मिळे. गावात कोठे लग्नमुंजी पंगत असली किंवा उत्सवाची समाराधना असली तेथेही मुले श्लोक म्हणत. जो श्लोक चांगला म्हणे त्याची सारे स्तुती करीत. अशा रीतीने घरीदारी श्लोक पाठ करावयास उत्तेजन मिळे. जेवताना सुंदर काव्य, सुंदर विचारांचे श्लोक कानावर पडत. जणू ते ऋषितर्पणच होत असे.
गावात कोठे जेवणावळ असली तर आमच्याकडे बोलावणे असावयाचेच. आमच्याबरोबर वडीलही आलेले असतील तर श्लोक म्हणावयास आम्हास मानेने, डोळयांनी इशारा देत व आम्ही लगेच म्हणत असू. घरी गेल्यावर वडील रागावतील ही भीती असे. मला श्लोक जरी चांगले व पुष्कळ येत होते तरी पंक्तीत मी लाजत असे. माझा आवाज फारसा चांगला नव्हता व सभाधीटपणाही नव्हता. लहानपणापासून मी समाजाला व समाजाच्या टीकेला भीत असे. मी लाजाळू पक्षी आहे.
फार तर थोडी तोडावी. नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी. तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत.
आज मी फूल तोडू शकत नाही. फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी-सौंदर्यमयी मूर्ती, असे मला वाटते. परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे. गुलबाक्षीच्या फुलांसाठी मुलांमुलींत भांडणे व्हावयाची. गुलबाक्षीचे फूल फार सुंदर असते. फुलांचा देठ लांब, बारीक व कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबाक्षीची फुले नाना रंगाची असतात. पिवळी, पीतांबरी, लाल, पांढरी, शिट्कावाची कितीतरी प्रकार! गुलबाक्षीचे