मोठया हंडयांना बाहेरून फडकी लावलेली होती व पाण्यात वाळा टाकलेला होता. घरोघरचे कोणी आले की नाही, का आले नाही, याची चवकशी झाली. जो येणार असून आला नसेल त्याच्याकडे हातात पळीपंचपात्र देऊन एखाद्या मुलाला पाठविण्यात येई. सारी मंडळी आल्यावर पानप्रोक्षण झाले व 'हरहर महादेव' होऊन मंडळी जेवावयास बसली.
मी मुकाटयाने जेवत होतो. श्लोक म्हणावयास सुरूवात झाली. मुलांनी श्लोक म्हणण्याचा सपाटा चालविला. कोणकोणाला शाबासकी मिळत होती. बायका वाढीत होत्या. एखाद्या बाईचा मुलगा पंक्तीत जेवत असला तर ती आपल्या मुलाला विचारी, 'बंडया! श्लोक म्हटलास का? म्हण आधी.' श्लोक म्हणणे म्हणजे सदाचार व भूषण मानले जाई. 'श्याम! श्लोक म्हण ना रे! तुला तर किती तरी चांगले येतात. तो 'चैतन्य सुमनं' नाही तर 'डिडिम डिम्मिन् डिम्मिन्-' म्हण. मला आग्रह होऊ लागला. मला लाज वाटे व म्हणण्याचे धैर्य होईना. 'बायक्या आहेस अगदी!'
एकसुध्दा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही. म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की, आज आपण सारी फुले आणावयाची. लौकर जाऊन कळयाच तोडून आणावयाच्या असे मी ठरविले. गुलबाक्षीची फुले चार वाजल्यावर फुलू लागतात, सायंकाळी नीट फुलतात. फुले फूलू लागण्याच्या आधीच मी जावयाचे ठरविले.
बाहेर ऊन होते तरी मी निघाले. एक फडके बरोबर घेतले होते, तीन वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्र्यांच्या घरापाठीमागील गुलबाक्षीच्या कळया मी तोडल्या. गुलबाक्षीच्या न फुललेल्या कळयांना