गगन-ताटी शुध्द नक्षत्ररत्ने' तो मी म्हटला व मला शाबासकी मिळाली.' असे वासू म्हणाला.
गोविंदा म्हणाला, 'असा येता देखे रथ निकट तो श्यामल हरी' हा मी म्हटला व नरसूअण्णांनी मला शाबासकी दिली.'
आई मला म्हणाली, 'श्याम? मला फसविलेस! खोटे बोललास ! श्लोक म्हटला म्हणून मला सांगितलेस?'
वासू म्हणाला, 'श्याम ! केव्हा रे म्हटलास?
बन्या म्हणाला, 'अरे त्याने मनात म्हटला असेल; तो आपल्याला कसा ऐकू येईल?'
बंडया म्हणाला, 'पण देवाने तर ऐकला असेल!' मुले माझी थट्टा करीत निघून गेली. मुले म्हणजे गावातील न्यायाधीशच असतात. कोणाचे काही लपू देणार नाहीत. गावातील सर्वांची बिंगे चव्हाटयावर आणणारी वर्तमानपत्रेच ती!
मला आई म्हणाली, 'श्याम ! तू श्लोक म्हटला नाहीस. ही एक चूक व खोटे बोललास ही तर फार भयंकर चूक! देवाच्या पाया पड व म्हण मी पुन्हा असे खोटे बोलणार नाही.' मी मुखस्तंभ तेथे उभा होतो.
आम्हाला एकही ठेविले नाही याने!' बाबी म्हणाली.
'का रे श्याम! केव्हा चोरटयासारखा जाऊन घेऊन आलास सारी फुले?' बापू बोलला.
'चोरटयासारखा? मी नेहमी नाही वाटते येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी?' मी म्हटले.
'नेहमी आपण सारीजण बरोबर असतो.' बन्या म्हणाला.
'तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा, एक तरी फूल ठेविले होते का माझ्यासाठी?' मी विचारले.
'पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का? तूच फणकार्यारने निघून गेलास. 'मला का नाही थांबलात? बरे पाहून घेईन!' असे म्हणून